Diwali 2024 : धनत्रयोदशी पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व
दिवाळीला खरी सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण असतो. धनतेरस म्हणूनही या सणाला ओळखतात.
धनत्रयोदशीचे महत्त्व
धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो.
या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात. धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस तेरावा दिवस दर्शवितो.
समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचे प्रकटन
पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली.
धन्वंतरीचा जन्मोत्सव
“आयुर्वेदाचे हिंदू देव, भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्याकारणाने या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो.” असे मानले जाते की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते.
धनत्रयोदशी मुहुर्त
धनत्रयोदशीची तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी सुरू होणार असून 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.
धनत्रयोदशी खरेदीचा मुहूर्त
यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे, यावेळी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पहिला मुहूर्त - 29 ऑक्टोबर सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून के 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे.
दुसरा मुहूर्त - दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे.
संध्याकाळचा मुहूर्त - संध्याकाळीही खरेदी करता येते. या दिवशी, संध्याकाळचा मुहूर्त 5 वाजून 38 मिनिटांपासून के 6 वाजून 04 मिनिटांपर्यंत असेल.
पूजेचा मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटं ते 8 वाजून 31 मिनिटं या वेळेत पूजा करता येईल. याचा अर्थ धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.
धनत्रयोदशीचे पूजन
धणे भरलेल्या नवीन भांड्याचे पूजन
या दिवशी सोने, चांदी , भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते. “नवीन भांड्यामध्ये धणे भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे.
कणिक पिठ व हळद घालून दिवा
“धनत्रयोदशी दिवशी, कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते.
झाडू अथवा केरसुणीची पुजा
याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पुजा केली जाते. घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते.
धनत्रयोदशी साजरी करण्यामागील पौराणिक कथा
धनत्रयोदशी या दिवशी यमदिपन करण्यामागील कथा
एका भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते.
यम जेव्हा राजकुमाराच्या खोलीत सापाच्या रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. यास्तव यम आपल्या यमलोकात परत जातो. तिने अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचवले.
त्यामुळे या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. सायंकाळी या दिवशी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. व त्या दिव्यास नमस्कार करतात. असा समज आहे याने अपमृत्यू टळतो.
समुद्र मंथनातून धन्वंतरीचे अमृतकुंभासह प्रकटन धन्वंतरी जयंती
धनत्रयोदशीबद्दल आणखी एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा राक्षसांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली.
त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले. म्हणूनच धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. यामुळे या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
हेही वाचा - दिवाळी - अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन विषयी जाणून घ्या
हेही वाचा - दिवाळी सण : प्रथा, परंपरा, आणि साजरा करण्याच्या पद्धती
0 Comments