उन्हाळ्यातील आहार-विहार
उन्हाळा - म्हणजे ग्रीष्म ऋतू. या दिवसांत सूर्याची तीव्र उष्णता शरीरातील स्निग्धता कमी करते.
त्यामुळे कडक उन्हाचा त्वचेशी थेट येणारा संपर्क टाळायला हवा.
उन्हाळ्यातील कपडे
* या दिवसांत खूप घाम येत असल्याने कमी कपडे घालण्याकडे सर्वाचा कल असतो.
* पण विशेषत: बाहेर पडताना त्वचा कपडय़ांनी झाकणे गरजेचे आहे. पण अंगभर कपडे घातले तरी त्वचेच्या उष्णता बाहेर टाकण्याच्या कार्यात अडथळा येता कामा नये अशा प्रकारचे कपडे असावेत.
* सिंथेटिक कापडाचे कपडे टाळावेत. ते उष्णता कोंडून ठेवतात.
* त्याऐवजी सुती, खादीचे किंवा कोणतेही नैसर्गिक कापडाचे कपडे वापरा.
थंड पाण्याने आंघोळ
* शीतल जलाने स्नान करा, असेही सांगितले गेले आहे. शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
दिवसाची झोप
* ग्रीष्म ऋतूत दिवसा झोपावे असेही सांगितले आहे. इतर वेळी दिवसाची झोप अयोग्य समजली जाते.
* पण या दिवसांत थंड खोलीत दुपारीही थोडा वेळ झोपले तर चालू शकते.
* तर रात्री चांदण्यात झोपण्याचा सल्ला आयुर्वेदात आढळतो.
कमी व्यायाम
* या ऋतूची आणखी एक वेगळी बाब अशी, की या दिवसांत व्यायाम कमी करावा.
* अति व्यायामाने नुकसान होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे हलका (मॉडरेट) व्यायाम या दिवसांत चांगला.
अन्न-पाणी कसे असावे?
* आंबट, खारट आणि तिखट पदार्थ या ऋतूत शक्यतो टाळावेत.
* त्याच्या उलट- म्हणजे मधुर, कडू आणि कषाय (तुरट) द्रव्यांचे सेवन अधिक करावे.
* फार जड व पचनशक्तीवर ताण पडेल असे काही खाऊ नये.
पांढरा तांदूळ खाणे
* ग्रीष्मात पांढरा तांदूळ खावा. पांढरा- म्हणजे चांगला पॉलिश केलेला तांदूळ.
* खरे तर इतर वेळी आपण पॉलिशचा तांदूळ नकोच, असे म्हणतो. पण उन्हाळ्यात तो चालेल.
* आहार घेताना दर दोन तासांनी खा असे सर्रास सांगितले जाते.
* उन्हाळ्यात मात्र ते फायदेशीर ठरेलच असे नाही. पचायला सोपा, हलका आहार घ्यावा.
* तसेच वारंवार न खाता ठरलेल्या २-३ वेळांना आहार घ्यावा.
म्हशीचे दूध
* रात्री झोपताना म्हशीचे दूध प्यावे असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो.
* म्हशीच्या दुधात स्निग्धता अधिक असते.
* साखर ज्यांना चालते त्यांनी साखरयुक्त दूध प्यायले तरी चालेल.
माठातले पाणी
* पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेदात ‘सुगंधी सलीला’चे सेवन करा, असा उल्लेख आहे. सुगंधी सलील म्हणजे नवीन माठातले मोगरा किंवा चंपासारखी ताजी सुगंधी फुले घातलेले पाणी प्यावे.
* पुरेसे पाणी पिणे व नेहमी बरोबर पाणी बाळगणेही गरजेचे.
काही महत्त्वाचे -
* आयुर्वेदात शरीरातील ‘मर्म सांगितली गेली आहेत. ही मर्म म्हणजे शरीरातील नाजूक ठिकाणे. त्यांना इजा पोहोचू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
डोके हे त्यातील महत्त्वाचे मर्म.
* उन्हात बाहेर जाताना डोके झाकलेले हवे असे म्हणतात ते त्यासाठीच.
* आपला मेंदू आणि डोळे हे खूप महत्त्वाचे अवयव आहेत.
* मेंदूत एकाच वेळी विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया सुरू असतात.
* मेंदूची स्वत:ची एक प्रकारची उष्णता तिथे असते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करणारे केंद्रही मेंदूतच आहे.
* उष्माघाताच्या वेळी या केंद्राच्या कामात बिघाड होतो. कदाचित त्यामुळेच आपल्या देशात विविध प्रकारची शिरस्त्राणे वापरत असावेत.
(उष्माघात याविषयी अधिक माहिती साठी येथे - क्लिक करा.)
* मराठवाडा, विदर्भ, खान्देशात दिवसा बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यावर हातापायांना कांद्याचा रस चोळणे हा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला उपाय आहे.
* खूप ऊन असलेल्या देशांमध्ये पाहिले तरी अंगभर कपडे, सुती कपडे, डोके झाकणे या पद्धती दिसतात.
* नामिबियामधील आदिवासींमध्ये तर गेरू व लोणी एकत्र करून उन्हापासून संरक्षणासाठी त्वचेवर त्याचा लेप घालण्याची पद्धतही दिसते.
वरीलप्रमाणे काही गोष्टींचे पालन करून व दैनंदिन व्यवहारात थोडीशी काळजी घेऊन उन्हाळ्यात आरोग्य व्यवस्थित ठेवून आनंदी उन्हाळा घालवता येईल.
0 Comments