दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी २६ उपक्रम व आव्हाने कोणती ते जाणून घ्या
सुट्टी हा वेळ अनेकांसाठी फक्त आरामाचा असतो, पण याच काळात आपण स्वतःला विविध कार्यांत व्यस्त ठेवून नवीन कौशल्ये शिकू शकतो. यामुळे फक्त आपल्या ज्ञानातच नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वातही भर पडते. पुढील लेखात विविध कार्यांची यादी दिलेली आहे, ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याने सुट्टीतून प्रेरणा घेतली पाहिजे.
सुट्टीत करावयाची कार्ये
1) बाजारात जाऊन आठवड्याची भाजी खरेदी करणे
कृती - रविवारी बाजारात जाऊन मंडईत जाऊन एक आठवड्यासाठीची भाजी आणा.
फलनिष्पत्ती - घरासाठी भाजीपाला आणणे ही छोटी पण महत्त्वाची जबाबदारी आहे. यातून तुम्हाला खर्चाचे नियोजन, बाजारातली विविधता, आणि किंमतीचा अंदाज येतो.
२) बँकेतील व्यवहार शिकणे
कृती -
बैंकेत जाऊन घरातल्या कोणाच्याही खातात पैसे जमा करा, काढा व पासबुक अपडेट करून या.
फलनिष्पत्ती -
घरातील सदस्यांच्या खात्यातील व्यवहार बघून, पासबुक अपडेट करून पैसे काढणे किंवा जमा करणे शिकणे हे आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.
3) ऑनलाइन तिकीट बुकिंग व रद्द करणे
कृती -
ऑनलाइन रेल्वे किंवा बस तिकीट काढा व रदद करा.
फलनिष्पत्ती -
रेल्वे किंवा बसचे ऑनलाइन तिकीट बुक करून रद्द करणे ही डिजिटल काळात आवश्यक कौशल्ये आहेत. यातून तुमच्या वेळेचे नियोजन, तिकीट बुकिंग प्रक्रियेचे ज्ञान मिळते.
४) घरातील माळा किंवा अडगळीची खोली साफ करणे
कृती -
घरातला माळा/अडगळीची खोली साफ करा.
फलनिष्पत्ती -
स्वच्छता ही केवळ शरीराचीच नव्हे तर मनाचीही गरज आहे. माळा, अडगळीची खोली किंवा कपाट साफ करणे यातून स्वच्छतेचे महत्त्व शिकता येते. विटनेटकेपणा शिस्तबद्धता परिसर वैयक्तिक स्वच्छता इत्यादींचे महत्त्व लक्षात येते.
५) स्वयंपाकात मदत करणे
कृती -
फोडणी करणे, कांदा चिरणे, भात लावणे, बटाटे-टोमॅटो चिरणे, पालेभाज्या निवडणे ह्यात आईला मदत करा. शिकून घ्या.
फलनिष्पत्ती -
फोडणी करणे, भात बनवणे, भाजी निवडणे हे शिकणे आवश्यक आहे. यातून विद्यार्थ्याला गृहकामातील जबाबदारीची जाणीव होते व स्वावलंबनाचे महत्त्व लक्षात येते.
६) वीज बिल भरणे व वीजचे नियोजन
कृती -
वीज बिल भरा. घरात किती युनिट वीज वापरली आहे ह्याचा अंदाज घ्या. कुठल्या उपकरणाला किती युनिट वीज वापरली जाते हे शोधा.
फलनिष्पत्ती -
विजेचा काटकसरीने वापर, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन, व्यवहारी ज्ञान, ऊर्जा बचत, विविध परिमाणांचे मोजमाप इत्यादींची माहिती मिळते.
७) गणवेश धुणे व इस्त्री करणे
कृती -
स्वतः चा गणवेश स्वतः धुवून इस्त्री करा.
फलनिष्पत्ती -
स्वतःची कपडे स्वच्छता ठेवणे हे तुमच्या शिस्तबद्धतेची ओळख बनते. यातून स्वावलंबन वाढते. स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा, श्रम प्रतिष्ठा इत्यादी गुणांचा विकास.
८) धान्य प्रकारांची माहिती घेणे
कृती -
तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हयांचे जास्तीत जास्त प्रकारांची माहिती मिळवा, किमान 3 दुकानांमध्ये जाऊन त्यांचे दर समजून घ्या. प्रत्येक प्रकार महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागात पिकवला जातो ह्याचा शोध घ्या.
फलनिष्पत्ती -
नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्त्व, कृषी तंत्रज्ञान, विविध पीक पद्धती, विविध अन्न पदार्थ, अन्नपदार्थांचा काटकसरीने वापर, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संरक्षण, जलसाक्षरता, कृषी वाणिज्याचा परिचय मिळतो.
९) आईची मुलाखत घेणे
कृती -
आईची मुलाखत घ्या. आईच्या दैनंदिन कार्याचे महत्त्व जाणून घ्या.
फलनिष्पत्ती -
यातून तुमच्या नातेसंबंधात प्रेम वाढण्यास मदत होईल. तिच्या अनुभवातून शिकण्याचा एक उत्तम मार्ग. श्रमाचे महत्त्व, कुटुंबातील जबाबदारी व भूमिका, नागरिकत्वाचे शिक्षण, स्वावलंबन व श्रम प्रतिष्ठा इत्यादी गुणांचा विकास होण्यास मदत.
१०) स्वयंपाक सोडून इतर कामे करणे
कृती -
सकाळी कामाला बाहेर पडण्याआधी स्वयंपाक सोडून आई जी इतर कामे करते ती एक दिवस करून पाहा.
फलनिष्पत्ती -
घरातील स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कामांचा अनुभव घेणे, कुटुंबातील योगदानाचे मूल्य वाढवणे.
११) कामगार व्यक्तीच्या घरी जाणे
कृती -
कामवाल्या किंवा मजुरी करणाऱ्या मावशीच्या घरी जाऊन या. जमल्यास जेवून या.
फलनिष्पत्ती -
यातून श्रमाचे महत्त्व समजते आणि कष्टकऱ्यांचे जीवन समजून घेण्याची संधी मिळते.
१२) औद्योगिक ठिकाणांना भेट देणे
कृती -
जवळच्या सायकलच्या दुकानात, ऑटोमोबाईल, पिठाची गिरणीत किंवा इतर छोट्या उद्योग धंद्याच्या ठिकाणी जाऊन तिथे दिवसभर काम करा.
फलनिष्पत्ती -
एखाद्या छोट्या उद्योगात जाऊन अनुभव मिळवा. यातून तुम्हाला कार्यक्षेत्राचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते. विविध तांत्रिक कौशल्यांचा परिचय, विविध कार्यक्षेत्रांचा परिचय, विविध संस्कृतींचा परिचय, उद्योजकता विकासास मदत.
१३) शासकीय विभागाला भेट देणे
कृती -
आवडत्या कुठल्याही शासकीय विभागात जाऊन एक दिवस काम करा.
फलनिष्पत्ती -
सरकारी कार्यालयात एक दिवस घालवून तिथल्या कार्यप्रणालीचा अनुभव घेणे यातून सरकारी प्रक्रियेची माहिती मिळते. लोकशाही मूल्यांचे रुजवणूक, जबाबदार नागरिकत्वाचे शिक्षण. घटनात्मक कर्तव्य व जबाबदाऱ्यांची जाणिव. लोकशाही प्रणालीची माहिती.
१४) आठवड्याचे खर्च नियोजन करणे
कृती -
स्वतः चा एक आठवड्याचा खर्च लिहून ठेवा, त्याप्रमाणे पुढच्या आठवड्याच्या खर्चाचे नियोजन करा.
फलनिष्पत्ती -
व्यवहारिक ज्ञान, खरेदी विक्री, नफा तोटा, गुंतवणूक परतावा इत्यादींची माहिती मिळते. खर्चातील शिस्त वाढते.
१५) रोज व्यायाम करणे
कृती -
रोज ठरवून कुठलाही व्यायाम करा.
फलनिष्पत्ती -
निरोगी शरीराचे महत्व, शिस्तबद्धपणा, कृतिशीलता इत्यादीचे महत्त्व समजते.
१६) ऐतिहासिक स्थळांना भेट देणे
कृती -
जवळील ऐतिहासिक किंवा धार्मिक ठिकाणाला भेट दया.
फलनिष्पत्ती -
ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धन, यात्रांचा वारसा व त्याची माहिती तसेच आपल्या परंपरेची माहिती मिळते.
१७) कचरा गोळा करणे
कृती -
एक दिवस ठरवून आजूबाजूच्या बागेतील किंवा रस्त्यावरचा कचरा गोळा करा.
फलनिष्पत्ती -
वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, नागरिकत्वाची जबाबदारी, सामाजिक जबाबदारीचे भान इत्यादींचा विकास होतो.
१८) परिसराचा नकाशा तयार करणे
कृती -
आपल्या घरापासूनचा २ किमी. परिसराचा नकाशा काढा. (महावितरण केंद्र, मंदिर, पोस्ट ऑफिस, गॅस दुकान, गिरणी, १ ऐतिहासिक वास्तू ह्या ठिकाणांचा त्यात समावेश करा)
फलनिष्पत्ती -
भौगोलिक परिस्थिती व रचना यांची माहिती मिळते. विविध सार्वजनिक ठिकाणांची माहिती मिळते. नागरिकत्वाचे शिक्ष, रहदारी नियमाचे शिक्षण मिळते.
१९) स्वतःचं तिकीट काढून प्रवास करणे
कृती -
रेल्वे किंवा बस ने स्वतः चे तिकीट काढून किमान एक तास प्रवास करून या.
फलनिष्पत्ती -
व्यावहारिक ज्ञान महत्वाचे कौशल्य आहे. आत्मनिर्भरता, नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव, सामाजिक अनुभव, सामाजिकता या विषयी माहिती मिळते.
२०) टाकाऊ वस्तू विकणे
कृती -
घरातली एक टाकाऊ वस्तू जुन्या बाजारात जाऊन विकून या.
फलनिष्पत्ती -
पुनर्वापराच्या महत्त्वाचे आकलन. नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन, कचरा पुनर्वापर, पर्यावरण संवर्धन, व्यवहारी ज्ञान त्यांची माहिती मिळते.
२१) क्रीडा प्रकारात सहभागी होणे
कृती -
कुठल्याही २ वेगळ्या मैदानावर जाऊन खेळून या. नवीन खेळ खेळून पहा.
फलनिष्पत्ती - हे तणावमुक्तीसाठी प्रभावी ठरते. संघटन क्षमता, नेतृत्व क्षमता, समायोजन, सामाजिकता इत्यादीचे शिक्षण मिळते.
२२) भिकारी किंवा गरीब व्यक्तीची मुलाखत घेणे
कृती -
२ भिकाऱ्यांची किंवा गरीब व्यक्तीची मुलाखत घ्या.
फलनिष्पत्ती -
सामाजिक दृष्ट्या वंचिताबद्दल सहानुभूती व समानानुभूती वाढते. श्रम प्रतिष्ठा, व्यवहारिकता, व्यावसायिकता, मानसिक आरोग्य इत्यादी विषयी माहिती मिळते.
२३) भारत मातेचे चित्र काढणे
कृती -
मातृभुमीची प्रतिमा म्हणजेच भारत मातेचे चित्र काढा त्यावर झालेल्या ४ प्रसिद्ध लढायांची ठिकाणे, महत्वाची धार्मिक ठिकाणे, सर्व दिशांची सगळयात सीमेवरची गाव, ८ परमवीर चक्र मिळवलेल्या जवानांची गाव दाखवा,
फलनिष्पत्ती -
देशभक्ती व देशप्रेम, भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक परिस्थिती विषयी माहिती मिळते, आकृती रेखाटनातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यस संधी.
२४) महाभारत, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशवृक्ष तयार करणे
कृती -
आजी-आजोबांची मदत घेऊन महाभारत, रामायण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील सर्व पात्रांमधले संबंध दाखवा, वंशवृक्ष किंवा वंशावळ तयार करा.
फलनिष्पत्ती -
नातेसंबंध, कुटुंबातील जबाबदारी व भूमिका, कुटुंब संस्थेविषयी माहिती, ऐतिहासिक व धार्मिक व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती मिळते.
२५) नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे
कृती -
सध्याच्या लेटेस्ट तंत्रज्ञानाबद्दलचे एक youtube चॅनेल शोधा आणि तुम्हाला आवडलेल्या technology चे व्हीडीओ बघुन PPT तयार करा.
फलनिष्पत्ती -
नवीन तंत्रज्ञानाचा परिचय व वापर, सर्जनशीलता इत्यादींचा विकास.
२६) सामाजिक संघटनांची माहिती मिळविणे
कृती -
तुमच्या परिसरात सामाजिक काम करत असलेल्या संस्था-संघटनांची माहिती काढून ती लिहून ठेवा.
फलनिष्पत्ती -
सामाजिक समस्या व त्यावरील उपाय योजना याविषयी जाणीव जागृती होते, सामाजिक जबाबदारीचे भान, सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळू शकते.
वरील पैकी किती कृती करणे आवश्यक आहे?
१ ते १२ पैकी ५,
१३ ते २० पैकी ४,
आणि २१ ते २५ पैकी ३
अशी एकूण १२ कृती करणे आवश्यक आहे.
आदर्श व्यक्तिमत्वाचा विदयार्थी कोण?
२० पेक्षा जास्त कृती जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्ही आदर्श विदयार्थी आहात असे समजावे.
हेही वाचा - दिवाळी - अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन विषयी संपूर्ण माहिती
सारांश
वरील कृतींची यादी ही केवळ सुटीतील एक चांगली योजना नसून, व्यक्तिमत्त्व विकासाचा एक मार्ग आहे. या कार्यांतून आत्मनिर्भरता, सामाजिकता, शारीरिक तंदुरुस्ती, आणि जीवनातील मूलभूत कौशल्यांचा विकास होतो. सुट्टीचा सदुपयोग करून आदर्श विद्यार्थी बनण्याची संधी या कार्यांतून मिळते.
0 Comments