भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सामाजिक क्रांतिचे प्रणेते
अन्य भारतीय विचारवंतांप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखन हे फक्त सैद्धान्तिक स्वरूपाच्या राजकीय चिंतनापूरते मर्यादित नाही.
तर ते मुख्यत्वे एका मुख्य सामाजिक क्रांतिप्रवाहाचे कृतिशील धुरीण होते. या देशाच्या सामाजिक व राजकीय वास्तवाच्या संदर्भात त्यांनी मांडलेल्या विचारांतून तसेच त्यांच्या विपुल ग्रंथसंपदेतून त्यांच्या राजकीय विचारांचे संकलन करता येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नवसमाजनिर्मितीचे पुरस्कर्ते :
सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात बाबासाहेबांनी जे विचार मांडले व कार्य केले त्याची जातकुळी महात्मा जोतीराव फुले, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याशी जुळणारी होती.
इतर उच्चवर्णीय-मध्यमवर्गीय सुधारकांप्रमाणे केवळ कौटुंबिक सुधारणांवर भर न देता त्यांनी सामाजिक संस्थांना पायाभूत असलेल्या मूल्यांवर टीका केली.
सामाजिक संरचनेत आमूलाग्र बदल करण्याची गरज प्रतिपादन केली आणि अनिष्ट रूढी परंपरांच्या मुळाशी असणारी धार्मिक चौकट त्याज्य ठरवली.
ज्यांच्यापर्यंत पूर्वी कधीही सुधारणेचे वारे पोचले नव्हते अशा वर्गापर्यंत बाबासाहेबांनी नव समाजनिर्मितीचा संदेश पोहचवला. हे त्यांचे कार्य ऐतिहासिक महत्त्वाचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची - वैचारिक जडणघडण :
एक विचारवंत म्हणून बाबासाहेबांची जडणघडण करणारे प्रवाह अनेक होते.
पाश्चिमात्य उदारमतवादी राजकीय विचार-परंपरेचा त्यांच्या मनावर खोल ठसा उमटला होता.
पण त्याचबरोबर प्राचीन हिंदू व बौद्ध साहित्याचाही त्यांनी तितकाच अभ्यास केला होता.
एका अभ्यासकाने म्हटल्याप्रमाणे,
"बाबासाहेबांनी आपली धर्मकल्पना - बर्क या विचारवंताकडून,
शासनविषयक सिद्धान्त - जे. एस् मिल आणि जेफरसन यांच्याकडून,
सामाजिक स्वतंत्रतेची संकल्पना - बुकर टी वॉशिंग्टनकडून घेतलेली होती."
फ्रान्सच्या क्रांतीच्या - स्वातंत्र्य - समता-बंधुता या त्रिसूत्रीने बाबासाहेबांना भारले होते.
तसेच अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा व संविधान ही त्यांची प्रेरणास्थाने होती.
Dr. Babasaheb Ambedkar - social reformer
बुद्ध हे गुरू :
या सर्व प्रवाहांइतकाच महत्त्वाचा प्रभाव त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा होता.
बौद्ध वाङ्मयातून तसेच हिंदू धर्म ग्रंथांमधूनही मोठ्या प्रमाणावर संदर्भ बाबासाहेब चर्चा मध्ये देत असत.
बुद्ध आपला गुरू असून त्याची शिकवण हिंदू धर्माचा व्यत्यास (अँटीथिसिस) आहे अशी बाबासाहेबांची धारणा होती.
बुद्धाने विवेक आणि बुद्धिप्रामाण्य यांनी पुन्हा प्रतिष्ठापना केली, प्रार्थना-कर्मकांड- बळी वगैरे अंधश्रद्धांना फाटा दिला. हे त्याचे कार्य बाबासाहेबांना फारच मोलाचे वाटते.
Dr. Babasaheb Ambedkar - यांच्यावरील संत कबिरांचा प्रभाव :
गौतम बुद्ध,महात्मा फुले यांच्या बरोबरीनेच आपल्या गुरुमालिकेत बाबासाहेबांनी कबीर या संताचाही अंतर्भाव केला आहे.
कबीराच्या दोह्यांचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला हिंदूधर्माच्या दोषांची स्पष्टपणे जाणीव होऊन धार्मिक दृष्टिकोन व व्यवहार बदलण्याची निकड भासली असे बाबासाहेब म्हणतात.
सामाजिक सुधारणेला प्रत्यक्ष जनसंपर्क आणि संघटनेची जोड :
महाराष्ट्रात जी सामाजिक सुधारकांची पिढी लोकहितवादी, महात्मा फुले, गो. ग. आगरकर यांच्या स्वरूपात उभी राहिली आणि 'आधी सामाजिक की राजकीय ?' या वादात जी बरीचशी निष्प्रभ झाली तिच्या कार्याचे व विचारांचे जोरदार समर्थन बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.
एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष जनसंपर्क आणि संघटनेची जोड नसल्यामुळे त्या सुधारकांच्या कार्यावर ज्या मर्यादा पडल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यात केला.
आमूलाग्र सुधारणेचे तत्त्वज्ञान व व्यवहार त्यांनीच महाराष्ट्राला आणि देशाला शिकविला.
विचारांना मानवतावादी तत्त्वज्ञानाची साथ :
राष्ट्र आणि राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक लोकशाही, राज्य समाजवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी विषयांवरील बाबासाहेबांचे विचार आपल्या बव्हंशी समकालीन विचारवंतांपेक्षा वेगळे होते.
कारण त्यांचा त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच संपूर्णपणे वेगळा होता.
केवळ राजकीय दृष्टीने ते कोणत्याच प्रश्नाचा विचार करू शकत नव्हते.
प्रत्येक प्रश्नाचे सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक संदर्भ त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत होते.
याचे कारण उघड होते. ज्या दलित-शोषित जीवनाची इतर नेत्यांना फक्त पुस्तकी माहिती होती ते जीवन बाबासाहेब स्वतः जगले होते.
त्यामुळेच त्यांच्या विचारांना मानवतावादी तत्त्वज्ञानाची साथ मिळाली आहे.
विवेकनिष्ठा सर्वश्रेष्ठ :
कोणतेच आदर्श त्रिकालाबाधित आहेत हे त्यांना कधीच पटले नाही. त्यामुळेच
विवेकनिष्ठा हा त्यांनी सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ निकष मानला.
0 Comments