इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये मध्ये वाढ | 5th and 6th scholarship examination

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिष्यवृत्ती रकमेमध्ये मध्ये वाढ


इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिष्यवृत्ती यावर्षीपासून रकमेमध्ये वाढ (5th and 6th scholarship examination)


शिष्यवृत्ती परीक्षा काय आहे? 


राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहीत करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मुळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे.

 शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरीता अधिकाधिक प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने दि. २.४.१९५४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. 

शालेय शिक्षण विभागाच्या दि.०२.०८.१९९५ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक करीता ३९५४ व माध्यमिक करीता ३८१४ संच मंजुर होते. 

शिष्यवृत्ती रकमेच्या पूर्वीचे दर काय होते?


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.१४.०२.२००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करून, उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे ७९०८ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे ७६२८ इतके संच मंजूर करण्यात आले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करण्यात आली आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजूर करण्यात आले आहेत.

 सद्यस्थितीत ए ते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती करीता १६६८३ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रू. २५०/- प्रतिवर्ष ते कमाल रू.१०००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते. 

तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रू. ३००/- ते कमाल रू. १५००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते.

शिष्यवृत्ती चा कालावधी किती असतो ?


  उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्षाकरीता व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून २ वर्षाकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. 

शिष्यवृत्ती रकमेमध्ये बदल का करण्यात आला?

विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने तसेच सदर शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये गेल्या १३ वर्षांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार शासनाने नवीन जीआर काढला आहे.

काय आहे नवीन शासन निर्णय ?

१. "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ५०००/- प्रतिवर्ष) व माध्यमिक शाळा (इयत्ता ८ वी) सर्व संचाकरीता रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ७५००/- प्रतिवर्ष) इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. शिष्यवृत्तीचे सुधारीत दर सन २०२३-२४ पासून लागू राहातील.

३. "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयाचे सहपत्र ई व एफ मध्ये नमूद संच एच (H) व संच आय (1) करीता लागू असलेली रु. २०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात येत आहे.

५. सदर योजनेकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यास तसेच लेखाधिकारी (लेखा), शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.