Header Ads Widget

प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजना : शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श | PM SHRI Yojana


प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजना (PM SHRI)


प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजना (PM SHRI)

भारतामध्ये ३४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, २०२० मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू झाले. हे धोरण पायाभूत शिक्षण, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाचा समग्र विचार करणारे आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व जीवनशैलीचा विचार करून तयार केलेले हे धोरण भारताच्या ज्ञानाच्या समृद्ध वारशाला पुनरुज्जीवित करण्यास मदत करणारे ठरेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी "प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया" (PM SHRI) योजना सुरु केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहे, जुन्या शाळांना नवीन रूप देऊन, त्या आदर्श शाळा बनवणे जेणे करून बाकीच्या शाळांनी या शाळा प्रमाणे स्वत:च्या शाळा तयार करण्यास प्रेरणा मिळेल.


पीएम श्री योजना: उद्दिष्ट आणि प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने या योजनेची सुरुवात केली. या योजने अंतर्गत प्रथम १४,५०० शाळांचा विकास होणार आहे, ज्यांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यामुळे इतर शाळांना प्रेरणा मिळेल आणि त्या शाळांनीही स्वत:च्या शाळांना उच्च गुणवत्तेच्या दिशेने तयार करण्याचा प्रयत्न करावा. या शाळांमधून जवळपास २० लाख मुलांना लाभ मिळणार आहे.


 शैक्षणिक धोरण आणि अभ्यासक्रम

PM SHRI शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-FS २०२२, NCF-SE २०२३) लागू करण्यात येईल. या शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावर लक्ष केंद्रित केले जाईल. 'निपुण भारत मिशन' राबवून, विद्यार्थ्यांद्वारे ग्रेड ३ पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.


शैक्षणिक स्तर

पायाभूत टप्पा : 

      3 वर्षे प्रीस्कूल किंवा अंगणवाडी, त्यानंतर प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 आणि 2.

तयारीचा टप्पा : 

     इयत्ता 3 ते 5, ज्यामध्ये हळूहळू बोलणे, वाचन, लेखन, शारीरिक शिक्षण, भाषा, कला, विज्ञान आणि गणित या विषयांची ओळख होईल.

मध्यम टप्पा : 

       इयत्ता 6 ते 8, जिथे गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, कला आणि मानविकी यांची ओळख होईल.

माध्यमिक टप्पा :  

       इयत्ता 9 ते 12, बहुविद्याशाखीय अभ्यास, सखोल आणि गंभीर विचार यांच्या सोबत जोडण्याचा उद्देश आहे.


हिरव्या आणि स्वच्छ शाळा (Green and Clean Schools)

हिरव्या आणि स्वच्छ शाळांसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालये, परिसर स्वच्छता, पर्यावरणपूरक झाडे, परसबाग, सांडपाणी व्यवस्था आणि गांडूळखत निर्मिती या बाबींचा समावेश असेल. या उपक्रमांसाठी युवा क्लब, इको क्लब, विद्यार्थी संसद तयार करण्यात येतील.


केंद्र शासनाच्या काही उपक्रम:

१. स्वच्छ विद्यालय पुरस्कार : शिक्षण मंत्रालयाकडून सुरु.

२. प्लास्टिक विरहीत शाळा: NSS, MCC, युवा क्लब, विद्यार्थी संसद मार्फत जाणीव जागृती.

३. सुजल मिशन: सांडपाणी पुनर्वापरासाठी प्रोत्साहन.

४. कॅच द रेन मिशन : पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे.

५. विद्यार्थी संसद : शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी व्यासपीठ.

६. शाळा सुरक्षा योजना : शाळेत आपत्कालीन प्रसंगी प्रशिक्षण.

७. जल जीवन मिशन : स्वच्छ शौचालय, स्वच्छ पाणी वापर.

८. स्वच्छता पंधरवडा :शाळेची स्वच्छता आणि स्वच्छतेची सवय लावणे.

९. मिशन लाईफ : पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन.


डिजिटल साक्षरता (Digital Literacy)

संपूर्ण जग डिजिटल झाल्यामुळे, मुलांना डिजिटल शिक्षणाची ओळख करून दिली जाईल. यामध्ये अध्ययन अध्यापनाचे वेगवेगळे स्थळे, ऑनलाईन बँकिंग, खरेदी, विक्री यांची माहिती दिली जाईल. ऑनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती दिली जाईल.


व्यावसायिक शिक्षण (Vocational Education)

इयत्ता ६ वी पासून व्यावसायिक शिक्षणाला प्रारंभ होईल. मुलांना व्यावसायिक कौशल्य जसे हेल्थ केअर, खाद्य संस्करण, विद्युत/इलेक्ट्रोनिक्स, आयटी, प्रवास आणि पर्यटन, बँकिंग यांचे शिक्षण दिले जाईल. यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, कुशल शिक्षक, क्षेत्रभेटी, तज्ञांचे व्याख्याने यश मुलांचे मूल्यमापन केले जाईल.


मानसिक आरोग्य (Mental Health)

मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेता, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवता येईल याचे शिक्षण दिले जाईल. पालकांच्या अपेक्षा, परीक्षा, महत्वाकांक्षा यामुळे मुलांवर होणारा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.


विद्यार्थ्यांचे स्वसंरक्षण (Self Defence)

बालकांचे संरक्षण ही गंभीर समस्या लक्षात घेता, मुलांना स्वसंरक्षण कसे करावे याचे कौशल्ये, तंत्र विकसित केले जातील. आरोग्यदायी नातेसंबंध, विश्वासू मित्र, स्पष्टवक्तेपणा, लिंगसमभाव याबाबतीत मुलांना शिक्षण दिले जाईल.


शालेय नेतृत्व (School Leadership)

शाळांना सर्वोत्तम करण्यासाठी उत्साही, स्वयंप्रेरित शिक्षकांची गरज आहे. शिक्षकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांना सकारात्मकता, आत्मविश्वास आणि २१ व्या शतकातील कौशल्ये अशा बाबींची ओळख करून दिली जाईल.


नाविन्यपूर्ण शिक्षण (Innovation)

विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन सुशिक्षित करणेच ध्येय नाही, तर त्यांना स्वत:च्या यशाचा मार्ग शोधता आला पाहिजे. यासाठी नाविन्यतेचा एक फ्रेमवर्क देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पना एकत्रित करून त्यातील सर्वोत्तम कल्पना विकसित करण्यात येईल.


सारांश 

PM SHRI शाळा इतर शाळांसाठी आदर्श मॉडेल शाळा असतील. सर्व शाळांनी अशा आदर्श शाळा बनवाव्यात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितलेले सर्व अपेक्षित परिणाम मिळवावे, अशी अपेक्षा आहे. शासनाने या शाळांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि पर्यवेक्षकीय यंत्रणा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.

Post a Comment

0 Comments